जमीर काझी, मुंबईराज्य पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पावणे दोन लाखांवर खाकी वर्दीवाल्यांसाठी एक खूशखबर आहे, त्यांचे शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्ण कामाबद्दल केलेल्या सन्मानाची आता आणखी एका वेगळ्या अर्थाने शासनाकडून नोंद ठेवली जाणार आहे. विविध प्रकारचे पदक, सन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे स्वतंत्र ओळखपत्र (आयडेंटीटी कार्ड) पोलीस महासंचालकांकडून मिळणार आहे. त्याच्या जोरावर त्यांना मिळणाऱ्या सुविधा, सवलतींचा लाभ घेता येणार आहे.‘सद्रक्षणाय व खल्निग्रहणाय’ ही बिरुदावली लावून नागरिकांच्या जीवित व वित्त मालमत्तेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांना त्यांच्या शौर्यपूर्ण व उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र, राज्य सरकार व पोलीस महासंचालकांकडून त्याच्या महत्त्वानुसार विविध प्रकारची १३ पदके व सन्मानाने गौरव केला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक, स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र दिनी त्याची घोषणा केली जाते. त्याचप्रमाणे विशिष्ट घटनेबाबत विशेष बाब म्हणून शासनाकडून पुरस्कार जाहीर केला जातो. पदकाच्या दर्जानुसार संबंधितांना मानधन, रेल्वे-बस प्रवास, शासकीय विश्रामधाम आदींमध्ये सवलती दिल्या जातात. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी त्यांना पदक किंवा त्याचे प्रमाणपत्र सोबत घेऊन संबंधित यंत्रणेला दाखवावे लागते, याबाबत खात्यातून होत असलेली ओरड लक्षात घेऊन पोलीस महासंचालक दयाळ यांनी प्रत्येक पदक, सन्मानचिन्हाबाबत संबंधिताला पोलीस मुख्यालयाकडून स्वतंत्र ओळखपत्र देण्याचे ठरविले आहे, जेणेकरून ते सहजपणे बाळगता येऊन त्याच्या आधारावर त्यांना त्याचा योग्यपणे वापर करता येईल. येत्या २६ जानेवारीपासून असे स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार असून, त्यासाठी राज्यातील विविध पोलीस घटकांतील प्रमुखांनी पदक, सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची छायचित्रासह माहिती पाठवायची आहे. त्यानंतर महासंचालकांकडून त्याबाबत कार्यवाही केली जाईल.
सवलतीच्या लाभासाठी डीजींकडून पोलिसांना विशेष ओळखपत्र
By admin | Published: January 05, 2015 6:27 AM