मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena Sanjay Raut) यांना आज पुन्हा एकदा ED च्या विशेष PMLA न्यायालयाने धक्का दिला. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय यांना ईडीकडून 1 ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ आणि त्यानंतर ईडी कार्यालयात आठ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक झाली होती. सुरूवातीला संजय राऊतांना 4-4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. तर 8 ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले होते. अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना 11 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. 19 जुलै आणि 27 जुलै असे दोनदा ते ईडीच्या चौकशीला अनुपस्थित राहिले होते. 1039 कोटी रुपयांच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना वैयक्तिक 100 कोटी रुपयांचा लाभ झाल्याची माहिती प्रवीण यांच्या चौकशीत पुढे आल्याचे बोलले जात होते. त्यानुसार ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय राऊतांना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आलेय
संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम नेमका कसा आहे, ते तिकडे नक्की काय करत आहेत, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. संजय राऊत यांचा कैदी क्रमांक 8959आहे. संजय राऊतांना घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येत असली तरी, संजय राऊत आपला बराचसा वेळ वाचन, लिखाणामध्ये घालवतात. शिवाय बातम्याही ते पाहत असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संजय राऊत यांना तुरुंगात इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. राऊत सध्या स्वतंत्र बराकीत आहेत. राऊत या कारागृहात वेळ मिळाल्यावर ग्रंथालयात वाचन करतात, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवरील बातम्यांवर त्यांचे लक्ष असते. कारागृहात त्यांना लेखनासाठी वही, पेन व अन्य साहित्य पुरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, विशेष कैदी असल्यामुळे राऊतांनाही सामान्य बराकीऐवजी 10 बाय 10आकाराच्या स्वतंत्र खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. या खोलीमध्ये पंखा, स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. या बरकीत संजय राऊत यांच्याशिवाय इतर कोणता कैदी नाही. आर्थर रोड कारागृहात मोजक्याच लोकांना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भेटायला त्यांचे बंधू सुनील राऊत आर्थर रोड कारागृहात गेले होते. विशेष म्हणजे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मुक्कामही सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.