मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी, ११ आॅगस्टपासून आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.ज्या महाविद्यालयांत चार गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही रिक्त जागा राहिलेल्या आहेत, त्यांची माहिती गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी विशेष फेरीसाठी अर्ज करायचे आवाहन उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी केले आहे.या विशेष फेरीसाठी पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे बाद झालेले विद्यार्थी, चार गुणवत्ता यादींपैकी एकाही यादीत नाव न आलेले विद्यार्थी, पहिल्या पंसतीचे महाविद्यालय न मिळालेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. याउलट प्रवेश मिळाल्यानंतर तो रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना स्थान मिळणार नाही.शुक्रवारपासून १३ आॅगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. रिक्त जागांनुसारच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पर्याय निवडावेत. १६ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता ही विशेष गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. तर १८ व १९ आॅगस्टदरमयन संबंधित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील.
अकरावीसाठी आजपासून विशेष फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:06 AM