लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ट्रान्स हार्बर आणि हार्बर रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने विशेष रुळ निरीक्षण मोहिम घेण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गावरील विस्कळीत होणाऱ्या लोकलचे प्रमाण वाढत असल्याने मध्य रेल्वेच्या वतीने तपासणी करणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर १८ व १९ मे आणि हार्बर मार्गावर २९ व ३० मे रोजी हे विशेष निरीक्षण मोहीम पार पडणार आहे.लोकल सेवेच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. मध्य रेल्वे अल्ट्रासॉनिक पद्धतीने ही विशेष मोहिम पूर्ण करणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री नेरुळ ते ठाणे दरम्यान ही तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. ही लोकल मध्यरात्री २.१५ वाजता ठाणे स्थानकासाठी सुटणार आहे. २.४५ वाजता ठाणे स्थानकात आल्यानंतर या लोकलचा परतीचा प्रवास २.५५ वाजता सुरु होणार आहे.हार्बर मार्गावर वाशी-वडाळा-पनवेल दरम्यान रुळांची तपासणी करण्यात येणार आहे. सोमवारी-मंगळवारी मध्य रात्री १ वाजता ही लोकल वाशी स्थानकाहून सुटणार असून १.३० वाजता वडाळा स्थानकांत पोहचणार आहे. वडाळा येथून १.४० वाजता पनवेलच्या दिशेने निघणार असून २.४० वाजता ही लोकल पनवेल स्थानकात पोहचेल. पनवेल स्थानकातून २.५० वाजता या विशेष लोकलचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. यावेळी रेल्वेरुळ ओलांडू नये, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.