मुंबई - मध्य रेल्वेसह कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त गणपती विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या विशेष ट्रेन फुल्ल झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या आणि गौरी आगमनावेळी पश्चिम महाराष्ट्रात जाणा-या भाविकांची संख्या अधिक असते. त्यामुळेच त्यांचा प्रवास विनागर्दी, तसेच निर्विघ्न व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या नियमांनुसार, १२० दिवस आधीपासून रेल्वे तिकीट आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुसार, गणेशोत्सवासाठी विशेष ट्रेनचे आरक्षण सुरू होताच प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्यास सुरुवात केली. यामुळे कोकणात जाणा-या राज्यराणी, तेजस, दादर-रत्नागिरी या आणि गणेशोत्सवासाठीच्या अन्य एक्स्प्रेसच्या वेटिंग लिस्टने तीनशेचा आकडा ओलांडला आहे. मध्य आणि कोकण रेल्वेच्या १३२ विशेष फेºयांपैकी बहुतांश फे-यांचीही हीच स्थिती आहे. वेटिंगवर असल्यामुळे रेल्वेने गणेशोत्वासाठी गावी जाता येईल का, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.गर्दी नियोजनासाठी रेल्वे प्रशासनाने दिवा आणि पेण स्थानकात मेल-एक्स्प्रेसला अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, दिवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला २ मिनिटांचा अतिरिक्त थांबा देण्यात येईल. याचप्रमाणे, पेण स्थानकात सीएसएमटी-रत्नागिरी, रत्नागिरी-पनवेल, पनेवल-सावंतवाडी रोड-पनवेल, रत्नागिरी-पुणे या ट्रेनला २ मिनिटांचा अतिरिक्त थांबा देण्यात येईल.आरक्षण १७ आॅगस्टपासून खुलेमध्य रेल्वेने पुणे-झरप-पुणे आणि अजनी-झरप-अजनी या अतिरिक्त साप्ताहिक ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-झरप-पुणे ही ट्रेन बुधवारी, १२ सप्टेंबरला पुणे येथून सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी रवाना होणार असून, झरप येथे रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल.साप्ताहिक विशेष ट्रेनपश्चिम रेल्वेने ट्रेन क्रमांक ०९१०६/०९१०५ वडोदरा-सावंतवाडी-वडोदरा एक्स्प्रेस ही साप्ताहिक विशेष म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबरच्या रविवारी ही एक्स्प्रेस वडोदरा येथून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. सोमवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ती सावंतवाडी येथे पोहोचेल. १६ आॅगस्टपासून एक्स्प्रेसचे आरक्षण खुले होईल. डहाणू रोड, पनवेल, वसई रोड मार्गे ही एक्स्प्रेस सावंतवाडी येथे पोहोचेल.अजनी-झरप-अजनी ही ट्रेन १० सप्टेंबर, सोमवार सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी रवाना होणार असून, मंगळवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी झरप येथे पोहोचेल. या ट्रेनचे आरक्षण १७ आॅगस्टपासून खुले होईल.
...अन् गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेही फुल्ल, वेटिंग लिस्टने ओलांडला तीनशेचा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 5:29 AM