बुलडाणा : लसीकरणापासून वंचित राहिलेल्या किंवा लसीकरण अपुरे राहिलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ७ एप्रिल ते १५ जुलै २0१५ पयर्ंत राज्यातील सर्व जिल्ह्यासह देशातील २0१ जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या पाहणी अहवालात संपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण ८0 टक्क्यांच्या आत आहे. दरवर्षी या लसीकरण अहवालात केवळ १ टक्क्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे संपूर्ण देशात 0 ते १८ महिन्यांपयर्ंतच्या बालकांचे १00 टक्के लसीकरण व्हावे, म्हणून लसीकरणातून सुटलेल्या बालक व गर्भवती मातांसाठी नियमित लसीकरण कार्यक्रमाव्यतिरिक्त खास लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम चार महिन्यांत चार टप्प्यात होत असून प्रथम टप्पा ७ ते १५ एप्रिल तसेच तिसरा टप्पा ७ ते १५ जून आणि दुसरा व चौथा टप्पा प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आठवड्यात होईल. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार २0१३ -१४ मध्ये अशीच मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळे इंद्रधनुष्य मोहीम हाती घेण्यात आली आहे.
*सात जिल्हे, १२ महानगरपालिकांचा समावेश
अपूर्ण लसीकरण, लसीकरणापासून वंचित बालके व गरोदर मातांचे प्रमाण जेथे किमान ५0 टक्क्यांपयर्ंत आहे, अशा ठिकाणांची निवड या मिशनसाठी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सात जिल्हे आणि १२ महानगर पालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यात बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, नाशिक, ठाणे यांचा समावेश आहे.