जमीर काझी मुंबई : राज्यातील लोकसभेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष २३ मे रोजीच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत असला, तरी सट्टाबाजारात युतीच फेव्हरेट आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जवळपास तिपटीने जास्त जागा मिळण्याची शक्यता असली, तरी सर्वाधिक जागेवर युतीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज बुकिंकडून वर्तविला जात आहे.
सट्टेबाजारात सध्या युतीच्या उमेदवाराला एका रुपयाला ९० पैसे, तर कॉँग्रेस आघाडीसाठी १.१५ पैसे भाव आहे. महिनाभरापूर्वी त्यासाठी अनुक्रमे ६५ पैसे व १.४० पैसे भाव सुरू होता, असे बुकींनी सांगितले. राज्यात ४८ जागांपैकी २८ ते ३० जागा युती तर १८ ते २० जागा कॉँग्रेस आघाडीला मिळतील, असा त्यांचा अंदाज आहे. मतदानाच्या वाढीव टक्केवारीचा लाभ कोणत्या पक्षाला होईल, याबाबत विभागवार अंदाज वर्तविला जात आहे.
राज्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी चार टप्प्यांत मतदान सुरळीत पार पडले आहे. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना, प्रमुख पक्षाचे नेते व उमेदवारांनी रॅली व सभा घेत राज्यातील सर्व मतदारसंघांत जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे तापमानात वाढ आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी असला, तरी मतांच्या टक्केवारीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सट्टेबाजारातही प्रचार व टप्पेनिहाय कालावधीत निवडणूक निकालावरील दरात सातत्याने चढउतार होत राहिला. यात मनसेचे राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा मोठा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपचे मनोमिलन झाले, तर विरोधकांमध्ये आघाडीला सोडून बहुजन वंचित आघाडी, सपा-बसपा अशी विभागणी झाली. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला युतीसाठी निवडणूक एकतर्फी असल्याचा कयास सट्टेबाजारात होता.
मात्र, कॉँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी नेटाने केलेला प्रचार व राज ठाकरेंच्या सभांमुळे निवडणुकीत चुरस वाढली. विशेषत: ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या शैलीचे गारूड राज्यभरात मतदारांवर झाल्याचे सट्टेबाजाराचे मत आहे. त्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंचा मतावर मोठा परिणाम होण्याचा बुकींचा अंदाज आहे. सोमवारी महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानानंतर सट्टेबाजांनी युतीलाच अधिक पसंती दिली आहे. युतीला एक रुपयामागे ९० पैसे, तर कॉँग्रेस आघाडीसाठी १.१५ इतका दर सध्या सुरू आहे.
वाढलेल्या मतदानाचा फायदा घेणारा उमेदवार विजयीमुंबईतील सहाही जागा सेना-भाजपच्या ताब्यात असून, पुन्हा एकतर्फी निकाल लागेल, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, आता दक्षिण मुंबई, उत्तर मध्य आणि उत्तर पश्चिम या ठिकाणी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तविली जात असून, उत्तर मुंबई व उत्तर पूर्वमध्येही युतीच्या उमेदवारांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल, असा बुकिंचा अंदाज आहे. वाढलेल्या २, ३ टक्के मतदानाचा फायदा घेणारा उमेदवार विजयी होईल, असे सांगण्यात येत आहे.
सातारा, बारामती, हातकणंगले एकतर्फीराज्यातील ४८ मतदारसंघांपैकी केवळ सातारा, बारामती व हातकणंगले मतदारसंघाचा निकाला एकतर्फी व मोठ्या मत फरकाने लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. या तीनही जागांवर युतीच्या विरोधातील उमेदवार सहजपणे जिंकतील, असा दावा करण्यात येत आहे.