मुंबई : सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महामंडळाने प्रवासी वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. असे असतानाही महामंडळ उद्दिष्टाकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते. एसटी महामंडळाच्या गाड्यांना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ताशी ६०च्या वेगाचा लॉक (स्पीड लॉक) बसवण्यात आला आहे. मात्र यामुळे महामंडळाचीच गोची होत असून, लॉकमुळे गाड्यांचा वेग खूपच मंदावला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७ हजार गाड्या असून, वर्षाला ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे महामंडळाला चांगलेच उत्पन्न मिळते. मात्र महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाले असून, यात वाढ करण्यासाठी एसटीकडून प्रयत्न केले जात आहेत. मुख्य बाब म्हणजे एसटीला स्पीड लॉक बसवल्यानेही त्याचा फटका बसत असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून एसटी गाड्यांना स्पीड लॉक बसवण्यात आल्यामुळे गाड्या धीम्या गतीने धावतात आणि त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर लागत आहे. यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी एसटीकडे येत आहेत. एसटी गाड्यांना ताशी ६०च्या वेगाचा स्पीड लॉकचा नियम आठ वर्षांपूर्वीच करण्यात आला आणि त्याची कठोर अंमलबजावणीही केली गेली. मात्र आगारात रिकाम्या गाड्यांना हा लॉक बसवल्यामुळे प्रवासी भरताच या गाड्या ४० ते ५०च्याच वेगाने धावत आहेत. एक्स्प्रेस मार्गांवर तर वेग पकडताच येत नसल्याने गाड्या उशिराने पोहोचतात आणि प्रवासी, चालकांमध्ये वाद उद्भवत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे उशिराने गाडी स्थानक किंवा आगारात पोहोचल्यास चालकांनाही याबाबत जाब विचारला जातो. त्यामुळे निदान गाड्यांना ८०चा स्पीड लॉक बसवावा, त्यामुळे प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर बसचा वेग हा ६० ते ७०पर्यंत जाईल, अशी मागणी एसटी युनियनकडूनही केली गेली आहे. (प्रतिनिधी)
स्पीड लॉक यंत्रणेमुळे मंदावतोय परिवहन बसेसचा वेग
By admin | Published: July 07, 2014 4:05 AM