लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठ कायदा पारित झाल्यानंतर, तब्बल २३ वर्षांनी राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निवडणुका होणार आहेत. विद्यार्थी संघटनांसह मुंबई विद्यापीठातही निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विहित केलेल्या नियामानुसार, विविध प्राधिकरणांच्या निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेला विद्यापीठाने सुरुवात केली आहे. विद्यापीठ अध्यापक, प्राचार्य आणि महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्रतिनिधींच्या नोंदणीसाठी, ५ जून ते ४ जुलै हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या प्रक्रियेत ४ हजार १५ अध्यापक, २७५ विद्यापीठ अध्यापक, १८६ प्राचार्य आणि २१३ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. ३० जूनपर्यंत पदवीधर नोंदणीची मुदत होती. या वेळेत ७० हजार १३० अर्जांची नोंदणी झाल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. ६९ हजार ३९२ अर्ज हे आॅफलाइन पद्धतीने प्राप्त झाले असून, ३ हजार ४२७ एवढे अर्ज हे आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आले आहेत. यापैकी ७३८ अर्जांची प्रत विद्यापीठाकडे जमा करण्यात आली आहे. १० जुलैनंतर मतदार याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. >१५ जुलैला अंतिम यादी!मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसांच्या आत चुकांची दुरुस्ती केली जाणार आहे. मतदार यादीतील वगळलेल्या किंवा चुकीच्या कोणत्याही नोंदी कुलसचिवांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत कोणताही विवाद असेल, तर मतदार यादीच्या विरोधातील अपील हे दुरुस्त मतदार यादी प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पाच दिवसांच्या आत कुलगुरूंकडे दाखल करण्यात येईल आणि यावर कुलगुरूंचा निर्णय अंतिम असेल. १५ जुलैदरम्यान अंतिम मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेला वेग
By admin | Published: July 10, 2017 2:31 AM