मुंबई : अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या मेट्रोचा वेग वाढवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी मेट्रोकडून नुकताच ब्लॉक घेवून ताशी ८0 किमी वेगाची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत घेण्यात आली होती. या चाचणीनंतर ताशी ८0 किमी वेगाच्या मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र ही मंजुरी देण्यात आली असली तरी सुरुवातीला तीन महिने ताशी ६५ किमी वेगापर्यंत मेट्रो धावण्याची अट घालण्यात आली आहे. सुरुवातीला ताशी ८० किलोमीटर वेगाने मेट्रोची चाचणी घेण्यात आली होती. मात्र त्याला अखेरची परवानगी ताशी ५0 किलोमीटर वेगाची देण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी मेट्रो प्रशासनाकतर्फे ताशी ८0 किमी वेग वाढवण्यासाठी प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर करण्यात आला. मात्र आयुक्तांकडून अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मेट्रो प्रशासनातर्फे ५ जुलै रोजी मेट्रोकडून सात तासांचा ब्लॉक घेवून वेगाची चाचणी घेण्यात आली. यावेळी मेट्रो पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या चाचणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मेट्रोला ताशी ८0 किमी वेगाची परवानगी देण्यात आली. तूर्तास सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीच्या तीन महिन्यापर्यंत ताशी ६५ किलोमीटर वेगाची अट घालण्यात आली आहे. यानंतर ते वेग आणखी वाढवू शकतात. - मेट्रोचे दोन प्रकारचे प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे होते. एक म्हणजे ताशी ८0 किमी वेग (ट्रॅक स्पीड) आणि दुसरा रोलिंग स्टोक. यात ट्रॅक स्पीडच्या प्रस्तावाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली आहे.तर रोलिंग स्टॉकसाठी (कोच)रेल्वे बॉर्डाची मंजुरी आवश्यक असून तो बॉर्डाकडे पाठवण्यात आल्याचे बक्षी यांनी सांगितले. सध्या मेट्रोला वर्सोवा ते घाटकोपर पोहोचण्यास साधारण २१ मिनिटे लागतात. वेग वाढविल्यामुळे त्यामुळे साधारण तीन ते चार मिनिटे वाचू शकतात,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मेट्रोचा वेग वाढणार
By admin | Published: July 15, 2015 12:41 AM