भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:05 AM2022-03-24T11:05:55+5:302022-03-24T11:09:39+5:30

विधान परिषदेतील दहा सदस्यांच्या निरोपावेळी अजित पवारांची टोलेबाजी

speed of pravin darekar progress is faster than BJP taunts ncp leader ajit pawar | भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी

भाजपपेक्षा दरेकरांच्या प्रगतीचा वेग जास्त; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फटकेबाजी

Next

मुंबई : सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर यांच्यासह दहा आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाल संपत आहे. या सदस्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक सदस्याची खास ओळख सांगत केलेल्या राजकीय फटकेबाजीने सभागृहाचे वातावरणच बदलून टाकले. एकीकडे शुभेच्छा देतानाच भावी राजकीय घडामोडींवर सूचक भाष्यही केले.

अजित पवार यांनी सभापतींच्या क्रिकेट प्रेम आणि कौशल्याचे किस्से सांगत भाषणाची सुरूवात केली. यानंतर प्रवीण दरेकरांना शुभेच्छा देताना राजकीय चिमटे काढले. सहकारात काम करणाऱ्या प्रवीण दरेकरांना गुंतवणूक कधी करायची आणि कधी काढायची, याची पक्की जाण आहे. एकेकाळी मनसेत राज ठाकरे यांच्याजवळ होते. योग्यवेळी तिथून बाहेर पडत भाजपमध्ये दाखल झाले आणि भाजप नेतृत्वाच्या जवळ पोहोचले. अशी किमया प्रत्येकाला जमत नाही. नरेंद्र मोदींच्या काळात भाजपने जितकी प्रगती केली, त्यापेक्षा जास्त वेगात दरेकरांनी प्रगती साधली. त्यांना हे कसे जमते, असा प्रश्न भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनाही पडला आहे, असे अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.  

प्रसाद लाडही असेच आहेत. आमच्याकडे होते तेव्हा आमच्या जवळ, आता भाजपमध्ये श्रेष्ठींच्या जवळ आहेत. त्यांच्या नावात प्रसाद पण आणि लाडही. कोणी कोणाला प्रसाद दिला आणि कुणाचे लाड केले हे सांगता येत नाही, असे  पवार म्हणाले आणि लाडांसह सगळेच हसू लागले. 

सदाभाऊ खोत यांच्याबद्दल पवार म्हणाले, शेतकरी संघटनेतून पुढे आलेले सदाभाऊ भाजपमध्ये आले आणि राजू शेट्टींसोबतचा हात सुटला. आता ते एकटेच खूप पुढे जात आहेत. अलीकडे आमच्या जयंत पाटील यांच्याशी खूप वेळ बोलत असतात. आधी या दोघांचे फार काही जमायचे नाही. आता इतका वेळ काय बोलत असतात कुणाला माहीत, असे पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. 

...आणि अजित पवारांवर एसआयटी 
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि सुनील गावस्कर यांचे क्रिकेट प्रशिक्षक एकच होते. एका अपघातामुळे क्रिकेटऐवजी ते राजकारणात आले. त्यामुळे देश एका चांगल्या क्रिकेटपटूला मुकला. आपल्या शेवटच्या सामन्यात निंबाळकरांनी ८२ धावा काढल्या. १८ धावांनी त्यांचे शतक हुकले. क्रिकेटचे हुकलेले शतक ते आपल्या आयुष्यात नक्की पूर्ण करतील, अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या. यावर ८२ धावांची ही माहिती तुम्हाला कशी कळली, यावर एसआयटी लावली पाहिजे, असे सभापती आपल्या उत्तरात म्हणाले. यावर, सीबीआय लावा, असे खालून उत्तर आले. त्याला आमच्या सभागृहात एसआयटी, निलंबनच चालते सीबीआय वगैरे नाही, असे उत्तर सभापतींनी देताच अजित पवारांसह सगळेच हास्यात बुडाले. 

पवारांनी सांगितले कुणाचे किती...  
दहा सदस्य निवृत्त होत आहेत. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि भाजपचे चार पुन्हा निवडून येणार, हे पक्के आहे. बाकी उरलेला एक जो जोर लावेल त्याचा आहे, असे म्हणताना प्रसाद लाड यांच्याकडे अजित पवारांची नजर होती. त्यामुळे ४-१-२-२च्या फॉर्म्युल्यात टि्वस्ट असेल, असाच सूचक इशारा पवारांनी दिला.  

निवृत्त होणारे दहा सदस्य 
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, विनायक मेटे, सदाभाऊ खोत, सुरजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, संजय दौड यांचा कार्यकाल जुलै महिन्यात संपत आहे. तर रवींद्र फाटक जून महिन्यात निवृत्त होत आहेत.

Web Title: speed of pravin darekar progress is faster than BJP taunts ncp leader ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.