आविष्कार देसाई,
अलिबाग- मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी लवकरच नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. इंदापूर-झाराप मार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुमारे चार हजार ८०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी सहा निविदा मागविण्यात आल्या आहेत. पैकी दोन निविदा बाकी आहेत. २०१८ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. आगामी काळात रस्ते वाहतुकीबरोबरच पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमानिमित्त गीते अलिबाग येथे आले होते. यावेळी बैठकीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पळस्पे- इंदापूर पहिल्या टप्प्याचे काम राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. कामाला गती येत नसल्याने राज्य सरकारने तो प्रकल्प केंद्राकडे वर्ग करणे गरजेचे होते, असेही गीते यांनी स्पष्ट केले.रोहा-कोलाड मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. अलिबाग- वडखळ राष्ट्रीय महामार्ग- ६६ च्या चौपदरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अलिबाग-विरार या कॉरिडोरच्या कामालाही गती देण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.अलिबाग तालुका रेल्वेने जोडण्याबाबत मध्य रेल्वेने परीक्षण, निरीक्षण केले आहे. त्याबाबतच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी सुमारे २८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आरसीएफ कंपनीने टाकलेला लोहमार्ग अस्तित्वात आहे. त्याच मार्गावरून रेल्वे सेवा सुरू करता येते का, याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रसायन मंत्री अनंत कुमार यांच्याबरोबरच बैठक झाली आहे. कुमार यांनी दुहेरी मार्ग करून त्यासाठी खर्च करण्याची तयारी दाखविली आहे, असेही गीते यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, किशोर जैन, दीपक रानवडे, कमलेश खरवले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. याप्रसंगी आमच्या सोबत, येणाऱ्यांची सोबत घेण्यात येईल. जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी १०० शाळांची निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम रोहा येथे घेण्यात येणार आहे.रायगड जिल्ह्यासाठी वोकहार्ट रुग्णालयाच्या माध्यमातून मेडिकल व्हॅन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचून त्यांना मोफत आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष दिले जाणार आहे. वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जीव गमावावा लागणार नाही. रुग्णांना औषधेही मोफत देण्यात येणार असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.