इंदल चव्हाणअमरावती, दि. 21 : जगात सुमारे ७ टक्के लोक प्रतिबंधात्मक फुफ्फुसाच्या आजाराने दगावत असल्याची माहिती आहे. जगभरात फुफ्फुसाच्या आजाराने दगावणा-यांत भारत चौथ्या स्थानी आहे. फुफ्फुसाचा आजार होण्यापूर्वी रुग्ण आपल्या उत्पन्नाचा सरासरी १५ टक्के खर्च धूम्रपानावर खर्च करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. आजारानंतर उपचारावर उत्पन्नाच्या ३० टक्के खर्च होत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे.भारतीयांना टीबी होण्याचे दोन मुख्य कारणांत प्रदूषण व धूम्रपानाचा समावेश होतो. धूम्रपानामुळे श्वसनविकार म्हणून संबोधले जाणारे दमा, अस्थमा, सीओपीडी (क्रोनिक आॅब्सेटरी पल्मोनरी डीसिज), क्षयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर, मुखरोग, अन्ननलिकेचा कॅन्सर आदी होतात. तर व्यक्तीचे आयुष्यमान सहा ते दहा वर्षांनी कमी होते. १३ ते १५ वर्षे वयाच्या २७ टक्के तरुणांमध्ये 'पॅसिव स्मोकिंग'मुळे प्रकृतीवर ४० टक्के प्रभाव दिसून येतो. धूम्रपान करणा-या व्यक्तीच्या घरातील सदस्यांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
धूम्रपान करणा-या लोकांत सिगारेटचा ८० टक्के सहभाग आहे. १५ टक्के विडीचा धूम्रपानासाठी वापर होतो. ५ टक्के लोक धूम्रपानासाठी हुक्का, चिलम आदी साधनांचा वापर करतात. 'इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस' या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार धूम्रपानामुळे दरवर्षी ५ टक्के लोकांचा मृत्यू होतो. यात पुरुषांच्या मृत्यूची टक्केवारी ११.१ असून, ४.५ टक्के महिलांचा समावेश आहे. शिवाय पुढील २०३० मध्ये धूम्रपान हे मृत्यूसाठी प्रमुख तिसरे कारण ठरणार असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.धुम्रपान करणा-यांच्या संख्येत वाढसिगारेटच्या धुरात वायू, बाष्पे व जलकणांचा समावेश असतो. धूम्रपानामुळे फुफ्फुसात ०.५ मायक्रॉन आकाराचे कण जमा होतात. सिगारेटच्या जळत्या टोकाचे तापमान सुमारे ८८४ अंश सेल्सिअसपर्यंत असते. एक सिगारेट ओढताना सुमारे ४ हजार हानीकारक तत्त्वे फुफ्फुसात प्रवेश करतात. सिगारेटच्या धुरात निकोटीनसह पिरिडीन, नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगे, आयसोप्रिनॉइड संयुगे, बाष्पनशील आम्ल, फिनॉलिकसारख्या पदार्थांचा समावेश असतो.धूम्रपानामुळे तोंडाचा, पोटाचा, फुफ्फुसाचा कॅन्सर व दम्याचा आजार होतो. हार्ट अटॅकही येऊ शकतो. त्यामुळे भारतात धूम्रपानामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक ठिकाणी पॅसिव स्मोकिंगमुळे धुराद्वारा इतरांनाही फुफ्फुसाचा आजार बळावतो. यावर सक्तीचे उपाय व्हायला हवे.- मनोज निचत,हृदयरोग, मधुमेहतज्ज्ञ, श्रीकृष्ण हॉस्पिटल, अमरावती