मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. नेहमी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राऊत विरोधकांवर हल्लाबोल करत असतात. परंतु शुक्रवारी पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी केलेले कृत्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर राऊत बाजूला थुंकले. त्यांचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला त्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.
मात्र शनिवारी संजय राऊत यांनी त्यांनी केलेल्या कृतीचे समर्थन करत वेगवेगळी विधाने केले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा किस्सा सांगून त्यांनी स्वत:ची तुलना थेट वीर सावरकरांशी केली अशी चर्चा आता सुरू झाली आहे आहे. संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकरांना एकदा न्यायालयात आणले होते, तेव्हा त्यांच्याविरोधात माहिती देणाऱ्या बेईमानाला पाहून ते थुंकले. इतिहासात त्याची नोंद आहे. बेईमानांवर थुंकणे ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा भाग आहे. वीर सावरकरांनीही त्यांचा संताप बेईमानांवर थुंकून व्यक्त केला होता असं राऊतांनी म्हटलं.
त्याचसोबत चीड, संताप कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकते. मी थुंकलो हे दाखवा. माझ्या दाताचा प्रॉब्लेम होता त्यातून ती कृती झाली. परंतु त्यांना असं वाटते लोक आमच्यावर थुंकतात. लोक थुंकतायेत हे खरे आहे पण मी कशाला व्यक्त करू? असं संजय राऊतांनी म्हटलं. त्यानंतरच पुन्हा मी राजकीय नेत्यांची नावे घेतल्यावर थुंकलो नाही तर बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबाशी, बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली त्यांचे नाव समजले आणि माझी जीभ चावली गेली त्यातून ती कृती झाली असं समर्थन संजय राऊतांनी केले.
अजित पवारांनी राऊतांना दिला सल्लाराजकीय प्रवक्त्यांनी आपल्या राज्याची संस्कृती जपली पाहिजे. आपल्या राज्याला स्व.यशवंतराव चव्हाण यांनी काही परंपरा घालून दिली आहे. संस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो हे देशाला दाखवून दिलं आहे, ते सर्व नेत्यांनी जपलं पाहिजे. प्रत्येक नेत्यांनी तारतम्य ठेवून वागलं पाहिजे असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संजय राऊतांना दिला परंतु त्यावर राऊतांनी धरणामध्ये मुंतण्यापेक्षा थुंकणे चांगले. प्रत्येकाने संयम राखला पाहिजे हे बरोबर आहे. पण ज्याचे जळते त्याला कळते. आम्ही भोगतोय, आम्ही भोगूनसुद्धा जमिनीवर उभे आहोत. आम्ही पक्षासोबत उभे आहोत. पळालो नाही. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, संकट येतायेत म्हणून भाजपासोबत सूत जुळवण्याचा विचार करत नाही असा पलटवार अजितदादांवर केला.