ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारताचे नागरिकत्व सोडून इसिसचा अधिकृत प्रवक्ता होण्याची इच्छा असल्याची वादग्रस्त पोस्ट जुबेर अहमद खान नामक तरुणाने सोशल मिडीयावर टाकल्याने खळबळ माजली आहे. जुबेरने स्वत:ला पत्रकार म्हटले असून जुबेरची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर मुंबई पोलिसांनी जुबेरचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.
याकूब मेमनच्या फाशीपूर्वी व फाशीनंतर जुबेर अहमद खान या तरुणाने फेसबुक व अन्य सोशल मिडीयावर काही पोस्ट टाकल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्याने इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल बगदादीचा उल्लेख करत इसिसचा अधिकृत प्रवक्ता होण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. ४ ऑगस्ट रोजी राजधानी एक्सप्रेसने दिल्लीत जाणार असून तिथून इराकच्या दुतावासात जाऊन इसिसमध्ये भरती होण्याचा प्रयत्न करु असे त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एका पोस्टमध्ये जुबेरने याकूब मेमन शहीद झाल्याचा उल्लेखही केला आहे.
एका सतर्क नागरिकाने मुंबई पोलिसांना जुबेरच्या फेसबुक पोस्टविषयी माहिती दिल्यावर पोलिसांनी जुबेरचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. जुबेर हा नवी मुंबईचा रहिवासी असून त्याला वांद्रे स्थानकापर्यंत ट्रेस करण्यात यश आले होते. मात्र पोलिस तिथे पोहोचेपर्यंत जुबेर पसार होण्यात यशस्वी झाला अशी माहिती एका पोलिस अधिका-याने दिली आहे. मुंबई विद्यापीठातून पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशनची पदवी व जर्नलिझम आणि मास कम्यूनिकेशनमध्ये पदव्यूत्तर शिक्षण घेतल्याचे जुबेरच्या सोशल मिडीया अकाऊंटमध्ये म्हटले आहे.