लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महाराष्ट्र बंदला सोमवारी नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ जिल्ह्यातून नाशिक, मुंबई, पुणेकडे जाणारी वाहने शेतकऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीच अडविली होती. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी भल्या पहाटेच धरपकड केली़ नगर-जामखेड रस्त्यावरील टाकळीकाझी येथे शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला केला़ सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे अटक करण्यात आली़ तर माजी आमदार शंकरराव गडाख यांना औरंगाबाद महामार्गावरील वडाळा फाटा येथून पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला़नगरसह पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव आणि अकोले मुख्यालयात दिवसभर शुकशुकाट होता़ तसेच तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठांसह आठवडे बाजार भरले नाहीत. नगर शहरातील बाजार समितीतील लिलाव व्यापाऱ्यांनीच बंद ठेवला़ मनमाड महामार्गावर देहरे येथे दुधाचे टँकर रस्त्यावर ओतण्यात आले़ कर्जतकरांनी आठवडे बाजार बंद ठेवून सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली़ रस्त्यावर ओतलेल्या दुधात बसून शेतकऱ्यांनी मुंडन केले़ कोपरगावातील कुंभारी येथेही शेतकऱ्यांनी मोर्चा काढून मुंडन केले़ श्रीगोंदा शहरातून सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला होता़ तालुक्यातील बेलवंडी गावातून सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली़ >‘लोकमत’ प्रतिनिधीला मारहाणबंद दरम्यानची छायाचित्रे काढणारे ‘लोकमत’चे चिचोंडी पाटील येथील प्रतिनिधी अन्सार शेख यांना पोलिसांनी मारहाण केली. शेख यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणून पोलीस निरीक्षकांनी मारहाण केली. याबाबत निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर व ग्रामीण पत्रकार संघटनांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात चार तास ठिय्या दिला. तीन दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: June 06, 2017 5:41 AM