मुंबई - मुंबईसह राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून १ डिसेंबरपर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.विदर्भातील ११ व खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दोन दिवस आहे. मुंबईसह कोकण, मराठवाड्यासह उर्वरित राज्यांतील २२ जिल्ह्यांत १ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात गारपिटीची शक्यता कुठेच नाही, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
मराठवाड्यात ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसानमराठवाड्यात गेल्या तीन दिवसांत ६१ मिमी. पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने मराठवाड्यातील ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. नांदेड जिल्ह्यातही २४ तासांत सरासरी २०.९० मिमी. पावसाची नोंद झाली असून ३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तोडणीला आलेला ऊस तसेच ज्वारी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा, तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्षाच्या फळबागेसह, भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे ५३ हजार ९७९ हेक्टरवरीलर पिकांचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यात मात्र, बुधवारी पावसाने उघडीप दिली.
नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यूसोलापूर : मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दुचाकीवरून घरी परतणारा दुचाकीस्वार कुंभार वेस येथील नाल्यात दुचाकीसह वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन्ही मित्रांनी त्याला नाल्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. सलाम साबीर दलाल (वय ३५, मंगळवार बाजार, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.