मुंबई/उस्मानाबाद : उस्मानाबादचा युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर याच्या वयावरून उठलेल्या वादळाची धूळ आता खाली बसलेली असली तरी, मंगळवारी विधानभवनात हा मुद्दा पुन्हा पटलावर आला. आ. सतीश चव्हाण यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताच्याआधारे हा प्रश्न लावून धरल्यानंतर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजवर्धनच्या वयाचा वाद काढून क्रीडा खात्याने आततायीपणा केल्याची कबुली दिली. उस्मानाबाद येथील युवा क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर हा १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य आहे. या विश्वचषकात व तत्पूर्वी झालेल्या आशिया चषकातही त्याने चमकदार कामगिरी केली होती. या बळावर त्याला आयपीएलमधील चेन्नई संघाने आपल्या ताफ्यात दीड कोटी रुपये मोजून समाविष्ट केले आहे. याचदरम्यान, राज्याच्या क्रीडा विभागाने त्याच्या वयाचा वाद उकरून काढला होता. राजवर्धनवर वय चोरीचा आरोप केला गेला; मात्र उस्मानाबाद जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीतून राजवर्धनला क्लीन चिट मिळाली आहे. याबाबतीत ‘लोकमत’ने पहिल्यांदा हे वृत्त उजेडात आणले होते. या पार्श्वभूमीवर क्रीडा खात्याने एखाद्या उमद्या खेळाडूला प्रोत्साहन द्यायचे सोडून, त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचा आरोप मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी मंगळवारी यासंदर्भात विधानभवनात आवाज उठविला. क्रीडामंत्र्यांनी दिले हे उत्तर...राजवर्धनच्या बाबतीत तक्रार झाली. त्याबाबतीत पूर्ण शहानिशा करून घेण्याच्या आधीच आमच्या खात्याने आततायीपणा दाखविला. एखाद्या खेळाडूचे संतुलन बिघडविण्याचे काम आमच्याकडून झाले असेल, तर निश्चितच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे उत्तर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी सभागृहात दिले. राजवर्धनच्या वयाच्या बाबतीत क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत. या प्रकरणात त्याला नोटीस पाठवून देण्यात आली. नंतर त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्याने लावलेले वय योग्य निघाले. मग या प्रकरणात चुका करणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, असा सवाल आमदार सतीश चव्हाण यांनी क्रीडा मंत्र्यांना केला.
युवा क्रिकेटपटू राजवर्धनबाबत क्रीडा खात्याचा आततायीपणा; क्रीडामंत्री सुनील केदार यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 9:23 AM