- सचिन भोसलेकोल्हापूर : दहावी व बारावी परीक्षेसाठी खेळाडू विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांना यापूर्वी २५ गुण मिळत होते. मात्र, शासनाने २० डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार यापुढे फक्त ७ क्रीडा गुण मिळणार आहेत. त्यामुळे सवलतीच्या गुणांना कात्री लावल्याने खेळाडूंसह पालकांतूही तीव्र विरोध होत आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी राज्याचे क्रीडा धोरण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार २०१२ पासून दहावी व बारावीत नापास होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनाच क्रीडा गुण सवलतीचा लाभ मिळत असल्याने खेळाबरोबर अभ्यासातही प्रगती करणाºया खेळाडू विद्यार्थ्यांना डावलले जात असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त झाली. त्यामुळे २१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयाने यात बदल करण्यात आला व खेळाडूंना क्रीडा गुणांचा लाभ झाला. परंतु त्यात पुन्हा बदल करण्यात आल्याने कमी गुण देण्याच्या निर्णयाविरुद्ध शनिवारी सायंकाळी शिवाजी स्टेडियम येथे जिल्ह्यातील जलतरणपटूंच्या पालकांनी बैठक घेऊन या अन्यायाविरोधात लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. याबद्दल बुधवारी २६ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांना निवेदन दिले जाणार आहे.विरोध का...?जी मुले खेळांत प्राविण्य मिळवतात, त्यांना अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अशांना या गुणांचा चांगला उपयोग होत होता. परंतु त्यांचे गुण कमी केल्याने मुलांना एकाचवेळी अभ्यास व खेळांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचा खेळाडूवर ताण येवू शकतो, अशी मुख्य तक्रार आहे.
खेळाचे गुण आता २५ वरून आले ७ वर , खेळाडू-पालकांतून विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 4:51 AM