तेजस वाघमारे, मुंबईमुंबई महानगर क्षेत्रात परवडणारी घरे उभारणीसाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीने शर्थीचे (एसपीपीएल) प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनी पुनरुज्जीवित करण्यासाठी शासनाने एसआरएकडील निधी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीचा वापर करून कंपनी मुंबईतील प्रलंबित एसआरए प्रकल्प मार्गी लावण्याचा विचार करत आहे, परंतु अद्यापही कंपनीच्या तिजोरीत हा निधी जमा झाला नसल्याने कंपनी या निधीच्या प्रतीक्षेत आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीला पुनरुज्जीवन देण्यासाठी राज्य शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील ५00 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे.एसआरएकडून प्राप्त होणारा निधी मुंबई वगळता इतरत्र वापरता येणार नसल्याने, कंपनी मुंबईतील एसआरए योजना राबविण्याचा विचार करत आहे. एमएमआर क्षेत्रात खासगी विकासक, जमीन मालकांच्या मदतीने घरे उभारण्यासाठी कंपनीने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये तीन एसआरए संस्थांनी शिवशाही कंपनीने प्रकल्प राबविण्याची मागणी केली आहे. एसआरएच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शिवशाही कंपनीला शासनाकडून ५00 कोटींचा निधी वितरित करण्यात येणार आहे. हा निधी शिवशाहीला मिळाल्यास तो मुंबईतील कामांसाठीच वापरता येणार आहे. एसआरए संस्थांनी पुनर्विकासासाठी प्रस्ताव दिल्याने, या झोपड्यांचा आणि इतर संस्थांचा पुनर्विकास करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे एसपीपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक देबाशिष चक्रबर्ती यांनी सांगितले.
एसपीपीएल कंपनी एसआरए मार्गी लावणार?
By admin | Published: November 23, 2015 2:12 AM