कोल्हापूर : शेतातील फवारणीचा पंप जुना झाला म्हणून पक्षाने नवीन पंप खरेदी केला; पण तो पंपच खोटा निघाला; तिथे पक्ष काय करणार, अशी उपरोधात्मक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांचे नाव न घेता केली. निवडणुका महागड्या झाल्याने पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली. ‘समाजप्रबोधन अभियान’साठी प्रा. ढोबळे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी अण्णा भाऊ साठे महामंडळात केलेल्या घोटाळ्याबाबत प्रा. ढोबळे यांना विचारले असता, पक्ष व मोहोळच्या आमदारांबद्दल कोणतीही तक्रार करायची नाही. उसळत्या रक्ताचा आमदार आहे, त्यांनी ८० कोटींची कंपनी विकत घेण्याचे धाडस केले आहे. अशा बड्या व्यक्तीला माझ्यासारखा पराभूत आमदार सल्ला कसा देऊ शकेल, असा टोलाही त्यांनी हाणला. (प्रतिनिधी)
फवारणीचा पंपच खोटा निघाला!
By admin | Published: August 03, 2015 12:49 AM