अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे. आता देशात आणि जगातही हिवरेबाजारचे नाव घेतले जात आहे. येथील विकास आणि जलव्यवस्थापनाचे प्रयोग देशातील सर्व कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असावेत. त्यामुळे ते गावोगावी पोहोचतील, अशी अपेक्षा राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामीण विकास पर्यटन केंद्राचे बुधवारी राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हिवरेबाजारचा गौरव करताना राज्यपाल म्हणाले, गाव पाहून आणि ग्रामस्थांना भेटून खूप आनंद झाला. येथे आलो ते फक्त प्रेरणा घेण्यासाठी. हिवरेबाजारने जलसंधारणाबाबतच्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये हिवरेबाजारचा गौरव केला आहे. जल नियोजन, दुष्काळाशी लढा देणारे गाव म्हणून हिवरेबाजारने जगासमोर आदर्श ठेवला आहे. मराठवाडा दुष्काळाचा सामना करीत आहे. अशावेळी येथील जलसंधारणाचे काम एक चमत्कार आहे. आता सर्वांनीच शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार, मृदसंधारणाची कामे यशस्वी करायची आहेत. एक कोटी झाडे लावून पर्यावरणाबाबत खूप मोठे काम करायचे आहे. महाराष्ट्र हे पर्यटन सक्षम राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले, जलदुर्ग बांधले. त्याचा विकास केला तर राज्यातील पर्यटन व्यवसायात ४० टक्के वाढ होईल. देशातील पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी आकर्षण आहे. पंडित नेहरूंनी नगरच्या भुईकोट किल्ल्यात ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’हा ग्रंथ लिहिला. त्या किल्ल्याचेही पर्यटन केंद्र व्हावे. ग्रामीण पर्यटन ही विकासाची केंद्रे आहेत. पंचायत राज व्यवस्था ही वेदकाळापासून भारतात आहे. महात्मा गांधी यांनीही खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला. पंडित नेहरू यांनी राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील गावात पहिल्यांदा निवडणूक घेतली. त्या गावाचे पुढे नावही राहिले नाही. त्यानंतर विकासात आघाडी घेतलेल्या हिवरेबाजारने पंचायत राजचा आदर्श प्रस्थापित केला आहे. पोपटराव पवार यांनी आता गावोगावी जाऊन जल व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार प्रमुख पाहुणे होते. (प्रतिनिधी)
‘हिवरे बाजार’ गावोगावी पोहोचवा!
By admin | Published: June 02, 2016 2:41 AM