मीरा रोड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मीरा रोडच्या कदम कुटुंबीयांच्या घरातील सासू, सून व नात अशा तीन पिढ्यांवर काळाने घाला घातला. दोन कर्त्या लक्ष्मी सोडून गेल्याने कदम कुटुंबीय सुन्न झाले आहे. मीरा रोडच्या सुंदरनगरमध्ये कदम कुटुंबीय १० वर्षांपासून राहत आहे. शिवाजी कदम हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सध्या ‘बेस्ट’च्या गोराई आगारात सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. त्यांचा मुलगा कल्याण हा समर्थ प्रॉडक्शनचा निर्माता आहे. कदम कुटुंबीय हे मूळचे साताऱ्यामधील सोनवडी गावचे. २०११ मध्ये कल्याणचा विवाह प्रिया निकम हिच्याशी झाला. शिवाजी कदम व त्यांची पत्नी चतुरा (४३), मुलगा कल्याण, सून प्रिया (२२) व पौर्णिमा (३) व ४ महिन्यांची अनन्या या दोन नाती असा त्यांचा परिवार आहे. मे महिन्याची सुटी, गावची यात्रा यामुळे २८ एप्रिलला चतुरा, प्रिया, पौर्णिमा व अनन्या हे गावाला गेले होते. कामामुळे शिवाजी व कल्याण दोघेच मीरा रोडच्या घरी होते. शुक्रवारी शिवाजी हे या चौघांना आणण्यासाठी गावाला गेले होते. शनिवारी रात्री कदम कुटुंबीय निखिल ट्रॅव्हल्सने परतत होते. सर्व साखरझोपेत असताना पहाटे भीषण अपघात झाला. चतुरा, प्रिया व अनन्या या तिघीही अपघाताचा बळी ठरल्या. शिवाजी हे गंभीर जखमी आहेत. दैव बलवत्तर म्हणून पौर्णिमाला जास्त इजा झाली नाही. सकाळी कल्याणला घरी कळवण्यात आले की, अपघातात वडिलांना किरकोळ मार लागला आहे. ते ऐकून कामावर जाण्यास निघालेल्या कल्याणच्या मनात धस्स झाले. पनवेलला पोहोचल्यावर समोरचे भयाण वास्तव पाहून त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. आई, पत्नी व मुलगी कायमची आपल्याला सोडून गेल्याचे कळताच कल्याणने हंबरडाच फोडला. शेजाऱ्यांनी घेतली पनवेलला धाव : कदम कुटुंबीय राहत असलेल्या सुंदरनगरमध्ये तर शोककळा पसरली. अपघातात तिघींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूवर अद्यापही अनेकांचा विश्वास बसत नाही. सकाळपासून अपघाताच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. परंतु, दुपारपर्यंत येथील रहिवाशांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. नंतर, काही शेजाऱ्यांनी पनवेलला धाव घेतली.
तीन पिढ्यांवर काळाने घातला घाला
By admin | Published: June 07, 2016 7:42 AM