मुंबई : विद्यार्थ्यांना प्राचीन ग्रंथांतील संस्कृत सुभाषिते कळावीत यासाठी सोमय्या महाविद्यालयाच्या भारतीय संस्कृती पिठमने पुढाकार घेतला अहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राचीन ग्रंथाचा प्रसार करण्यात येत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना साऱ्या गोष्टी एका क्लिकवर हव्या असतात. त्यामुळे जाडजूड ग्रंथ हाताळण्याचा त्यांना कंटाळा येतो. संस्कृत भाषेचे जतन व्हावे आणि तिची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी विद्याविहार येथील क.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या भारतीय संस्कृती पिठमने सोशल मीडियावर ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य, व्यायाम, आहार, दैनंदिन जीवन, मन, आर्थिक व्यवहार, नेतृत्व गुण विषयावरील विविध प्राचीन ग्रंथांतील सुभाषिते पाठवण्यात येतात. सोमवार, बुधवार, शुक्रवारी ग्रुपमधील विद्यार्थ्यांना संस्कृत सुभाषिते पाठवली जातात. आणि त्यावर चर्चा केली जाते. फेसबुक, व्हॉटसअॅप आणि हँगआऊट्स या इन्स्टंट मेसेजिंगच्या साहाय्याने लिखित आणि ध्वनी स्वरुपातील संस्कृत सुभाषिते ४ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांना पाठवली जातात. संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि प्राचीन ग्रंथाची अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे भारतीय संस्कृत पिठमच्या संचालक कला आचार्य यांनी सांगितले.
सोशल मीडियातून संस्कृतचा प्रसार
By admin | Published: April 29, 2016 3:22 AM