कोल्हापूर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शाहूचरित्र जगभरात पोहोचावे, यासाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ. जयसिंगराव पवार हे शुक्रवारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत शाहू विचारांचा जगभर प्रसार हेच मिशन म्हणून काम करत राहणार, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माझा जन्म जरी सांगली जिल्ह्यात झाला असला, तरी कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. जुन्या अकरावीनंतर मी कोल्हापुरात आलो. राजाराम महाविद्यालयात शिकत होतो. माझे शिक्षण झाले ते कर्मवीर अण्णा पाटील, माझे वडील आणि शाहू महाराजांमुळे. त्यांनी जर आमच्यासारख्या मुलांसाठी वसतिगृहे काढली नसती, तर आम्हाला शिकायला मिळाले नसते. त्यामुळे मी या सर्वांचे ॠण मानतो. व्ही. टी. पाटील यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला ठेवली होती. पत्नी वसुधा यांच्या आग्रहामुळे मी तिथे गेलो, तर पुरंदरेंनी तुमच्याच कोल्हापुरात एक तरुण इतिहास संशोधक चांगले काम करतोय, अशी माझी ओळख करून दिली, तेव्हा मी प्रेक्षकात होतो आणि तिसऱ्या दिवशी व्ही. टी. पाटील यांनी मला व्यासपीठावर बोलावून घेतले आणि महाराणी ताराराणी यांच्यावर पुस्तक लिहिण्याची सूचना केली व पुरंदरे यांच्याच हस्ते १९७५ साली पुस्तकाचे प्रकाशन झाले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.(प्रतिनिधी)आत्मचरित्र लिहिणारआजपर्यंत शाहू चरित्र ग्रंथाच्या १५ हजार प्रती संपल्या. देशी-विदेशी भाषांमध्ये शाहू चरित्र गेले. गुजराती, सिंधी आता तयार आहे. शाहू चरित्राची तिसरी आवृत्ती, ताराराणी यांच्या सुधारित चरित्राचे प्रकाशन केले जाणार आहे. शिवाजी महाराजांवर विश्लेषणात्मक पद्धतीने ग्रंथ लिहिणार आहे, तसा ‘शब्द’ मी गोविंद पानसरे यांना दिला होता. आत्मचरित्रही लिहायचे आहे. त्याही कामाला आता सुरुवात करणार आहे.
‘शाहू विचारांचा प्रसार हेच मिशन’
By admin | Published: December 30, 2016 1:52 AM