मुंबई : देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे होत असताना समाजातील काही वर्गांमध्ये नैराश्य आढळून येत आहे. या समाजातील स्पंदने सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ म्हणजेच अनुलोम ट्रस्टने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दादर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अनुलोम राज्यस्तरीय अभ्यासवर्गा’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वझे, पंकज पाठक, स्वानंद ओक, पुष्कराज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विकासाच्या वाटचालीत देश आणि राज्य वेगाने प्रगती करीत असताना समाजातील ज्या वर्गांमध्ये नैराश्य आहे, त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ‘अनुलोम’ ट्रस्ट हा एक सकारात्मक समूह असून, या समूहाने समाजाची मानसिकता बदलण्याचे काम करावे. जनतेशी संवाद साधला तरच जनतेची स्पंदने कळतील. यासाठी ट्रस्टने शासन आणि जनता यांच्यामधील सेतू बनावे. समाजामध्ये बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीच्या आधारावर जनमत तयार होते. त्यासाठी जनतेशी ‘हार्ट टू हार्ट’ संवाद होणे आवश्यक असून, ट्रस्ट जे काम करीत आहे ते समाजासाठी आहे. अनुलोम ट्रस्टच्या प्रशिक्षणार्थींनी शेतकरी विमा, पीक विमा, जलयुक्त शिवार या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रा. सुरेश खानापूरकर, डॉ. प्रकाश देवधर, हृषीकेश यादव यांचा या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)>सुसंवाद महत्त्वाचामुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी जनतेशी वारंवार संवाद साधून त्यांना गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. १ कोटी नागरिकांनी ही सबसिडी सोडली. देशाच्या १६ हजार कोटी रुपयांची बचत सुसंवादामुळे झाली.
समाजस्पंदने सरकारपर्यंत पोहोचवावीत
By admin | Published: July 04, 2016 5:06 AM