पुणे: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी पिके करपू लागल्याची स्थिती असतानाच गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्यामुळे पिकांना संजीवनी मिळली आहे. पुणे विभागातील काही तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या आहेत.त्यामुळे जनावरांना काही दिवस का होईना हिरवा चारा उपलब्ध होणार आहे.सांगली जिल्ह्यात आटपाडीमध्ये ६५.३० मि.मी.तर खानापूरमध्ये ३९.४० मि.मी पावसाची नोंद झाली आहे.परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे.काही तालुक्यात खरीपाच्या पिकांबरोबरच रब्बी पिकेही जळून गेली आहेत.त्यातच जनावरांनाही चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्य शासनातर्फे दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले आहेत.तसेच पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या टँकरच्या संख्येत वाढ होत चालाली आहे.त्यात गेल्या दोन दिवसात पुणे विभागातील पुणे,सांगली,सातारा,कोलापूर व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने सुखद वातावरण निर्माण झाले आहे.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सांगली जिल्ह्यात काही तालुक्यात आवकाळी पाऊस झाला आहे.त्यात सोमवारपर्यंत (दि.१९) खानापूरमध्ये ३९.४०मि.मी.,आटपाडीत ५६.३० मि.मी., केडगावमध्ये ३१.६० मि.मी., पलूसमध्ये १२.८० मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात १८.४० मि.मी.,पंढरपूरमध्ये १२.९६ मि.मी., सांगोलामध्ये ८.७२ मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर येथे १२.५४ मि.मी. आणि भूदरगडमध्ये १८.०० मि.मी.पाऊस नोंदविला गेला.साता-यात काही ठिकाणी १ ते ७ मि.मी.पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात बारामती,इंदापूर व पुरंदर तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या मंगळवार (दि.२०)च्या अहवालानुसार साता-यात माण तालुक्यात १९.२९ मि.मी.पावसाची नोंद झाली.तर पाटण,कराड,कोरेगाव,खटाव,खंडाळा,वाई येथे ३ ते ७ मि.मी.पावसाची नोंद झाली.सांगलीत शिराळा येथे ११.३० मि.मी.पाऊस झाला असून मिरज,इस्लामपूर,तासगाव आणि कवठेमहाकाळ येथे १ ते ७ मि.मी.एवढा पाऊस झाला.पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात यंदा केवळ ४० टक्के पाऊस झाला आहे.सोलापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात मोहोळमध्ये १७.९० मि.मी.,माळशिरस येथे १०.६० मि.मी., करमाळ्यात १६.८८ मि.मी. आणि अक्कलकोट येथे १३.०० मि.मी.तर दक्षिण सोलापूरात २०.९१ मि.मी.पावसाची नोंद झाली.त्याचप्रमाणे बार्शी,पंढरपूर,मंगळवेढा या भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.तर कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडीत १८.६७ आणि शिरोळमध्ये ९.४३ मि.मी.पावसाची नोंद झाली................अवकाळी पावसामुळे बहुतांश वेळा पिकांचे नुकसानच होते.मात्र,सुमारे अडीच महिन्यापासून काही भागात पाऊसाने पाठ फिरवली आहे.त्यामुळे पाण्याआभावी करपू लागलेल्या ज्वारीसारख्या पिकांना दिलासा मिळाला आहे.परंतु,काढणीला आलेल्या भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यात रब्बीवर अवकाळी पावसाचा सुखद शिडकावा; पिकांना संजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 1:08 PM
परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांबरोबरच रब्बी पिकेही जळून गेली आहेत.
ठळक मुद्देजनावरांना काही दिवस का होईना हिरवा चारा उपलब्ध होणारपुणे विभागातील काही तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या टँकरच्या संख्येत वाढ