अकोला: किडनी तस्करी प्रकरणामध्ये खदान पोलिसांचे पथक तपासासाठी औरंगाबाद व बिल्डा येथे गेले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांसह आणखी एक पथक मुंबई येथे तपासकामी गेले आहे. जुने शहरातील रहिवासी संतोष कोल्हटकर, संतोष गवळी, शांताबाई खरात यांच्या किडनी काढल्यानंतर त्यांना ठरलेली रक्कम देण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाच्या तक्रारीवरून किडनी तस्करीसह फसवणुकीचे गुन्हे जुने शहर पोलीस ठाणे व डाबकी रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या दोन प्रकरणांचा तपास दोन अधिकार्यांकडून करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असून, डाबकी रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगनराव इंगळे करीत आहेत. या प्रकरणातील काही महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत करण्यासाठी खदान पोलिसांचे पथक औरंगाबाद व बिल्डा येथे गेले असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबई येथे गेले आहे. ही दोन्ही पथकं काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेऊन दोन दिवसांत अकोल्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. किडनी तस्करी प्रकरणात संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही.
मुंबई, औरंगाबादला पथकं रवाना
By admin | Published: January 08, 2016 2:17 AM