विशेष प्रतिनिधी/ नांदुरा (बुलडाणा)नांदुरा येथील तिरुपती बालाजी संस्थानमध्ये हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर श्री बालाजी भगवानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अत्यंत उत्साहात करण्यात आली. यावेळी येथील १0५ फूट उंचीच्या विराट हनुमान मूर्तीचा जलाभिषेक करून, तब्बल ३५0 किलोंचा हार चढविण्यात आला.हनुमान जयंतीनिमित्त हा खास धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. आंध्र प्रदेशातून आलेल्या १५ ब्रह्मवृंदांकडून हा ऐतिहासिक पूजा विधी भक्तीमय वातावरणात पार पडला. अखंड काळ्या पाषाणातून घडविलेली भगवान बालाजीची मूर्ती यावेळी स्थापित करण्यात आली. याशिवाय श्रीगणेश व इतर देवांच्या मूर्तींचीही प्रतिस्थापना करण्यात आली. ३३ गुंठे क्षेत्रावर उभारलेल्या भव्य अशा भगवान बालाजीच्या मंदिराचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले. तत्पूर्वी, हनुमान जयंतीनिमित्त देशातील सर्वाधिक १0५ फूट उंचीच्या विराट हनुमान मूर्तीला जलाभिषेक करून मान्यवरांच्या उपस्थितीत ३५0 किलोचा चित्ताकर्षक फुलांनी सजवलेला हार रिमोटने वाहण्यात आला. पवनसुत हनुमान की जय आणि गोविंदा गोविंदाच्या मधुर जयघोषाने परिसर निनादला होता. याप्रसंगी सनई, चौघडा, सुमंगल वाद्य दाक्षिणात्य पद्धतीने वाजविण्यात आले. मंदिरावर क्रेनच्या सहाय्याने सदस्य अनिल पाटील यांनी दिलेल्या ५५ फूट सागवानच्या गरुडस्तंभाची स्थापना करून पूजन करण्यात आले. गत पाच दिवसांपासून भक्तीमय वातावरणात सुरु असलेल्या कार्यक्रमात महासत्संगाचा लाभ भाविकांनी घेतला. गायिका अनुराधा पौडवाल यांची भक्ती भजन संध्या श्रवणीय ठरली. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला विदर्भमीरा सुश्री अलकाश्री यांची भजन संध्या व सुंदरकांड भाविकांना भावले. संस्थानचे अध्यक्ष मोहनराव आणि सदस्यांनी, तसेच बालाजी भक्तांनी प्राणप्रतिष्ठा महोत्सवात सहभाग घेतला. कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री तिरुपती बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By admin | Published: April 23, 2016 2:27 AM