मुंबई- वादग्रस्त ट्विट करण्यासाठी राम गोपाल वर्मा नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विट्सवरून वादही उद्भवतात. आता त्यांनी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलही अशाच आशयाचं ट्विट केलं आहे. श्रीदेवी सुंदर अभिनेत्री असली तरी अत्यंत दुःखी महिला होती. श्रीदेवींची नातेवाईकांनी ब-याचदा फसवणूक केली होती, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे.
दुबईमधल्या जुमैरा एमिरेट्स टॉवर या हॉटेलच्या रूम नंबर 2201 मध्ये शनिवारी रात्री श्रीदेवी बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. श्रीदेवींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होते. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यू तोल गेल्याने बाथटबमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मृत्यूचे गूढ आणखी वाढतच होते. त्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील अनेक निर्माते, अभिनेत्यांकडून त्याबाबत दुःख व्यक्त केलं जातंय. राम गोपाल वर्मानंसुद्धा श्रीदेवींच्या चाहत्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. वर्मा लिहितात, ती खूप सुंदर अभिनेत्री असून, देशातील सर्वात मोठी सुपरस्टार होती. 20 वर्षांहून अधिक काळ तिने सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवलं.श्रीदेवी यांचं आयुष्य त्यांच्या दृष्टीनं परफेक्ट होतं. सुंदर चेहरा, वाखाणण्याजोगं टॅलेंट, दोन मुलींसोबत चांगला परिवार होता. बाहेरून सगळंच चांगलं दिसतं. पण खरंच श्रीदेवी तिच्या आयुष्यात खूश होती का ?, आनंदी आयुष्य जगत होती का ?, असं म्हणत परिस्थिती या उलट असल्याचं राम गोपाल वर्मानं पत्रात नमूद केलं आहे. वडिलांच्या मृत्यूपर्यंत श्रीदेवी यांचं आयुष्य आकाशात उडणा-या एखाद्या पक्षाप्रमाणे स्वच्छंदी होतं. परंतु आईला असलेल्या मुलीच्या काळजीमुळे श्रीदेवींचं आयुष्य एखाद्या पिंज-यात बंद असलेल्या पक्ष्यासारखी झाली होती. त्या काळात कलाकारांना मानधन काळ्या पैशातून दिलं जात होतं.श्रीदेवीच्या वडिलांनी प्राप्तिकर विभागाच्या भीतीनं पैसे मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केले होते. परंतु त्या लोकांनी श्रीदेवींसोबत दगाबाजी केली. त्यानंतर श्रीदेवींच्या आईनं कायद्याच्या कचाट्यात अडकलेली मालमत्ता सोडवण्यासाठी उर्वरित पैसा खर्च केला आणि या कारणांमुळे श्रीदेवींच्या कुटुंबीयांना पै अन् पैसाठी झगडावं लागलं. त्यानंतर श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर आले. बोनी स्वतः मोठ्या कर्जात होते. अशा परिस्थितीत ते श्रीदेवींसोबत फक्त दुःख वाटू शकत होते. आईनं सर्व मालमत्ता ही श्रीदेवींच्या नावे केली. परंतु तिच्या बहिणीनं मालमत्तेतील अर्धा हिस्सा मागितला आणि श्रीदेवींविरुद्ध खटला भरला. आईनं जेव्हा कागदपत्रांवर स्वाक्षरी केली तेव्हा ती शुद्धीत नसल्याचा दावा श्रीदेवीच्या बहिणीनं केला होता. त्यावेळी आईची ब्रेन सर्जरी झाल्याचंही श्रीदेवीच्या बहिणीनं सांगितलं होतं. अशात अख्ख्या जगात नाव कमावलेली श्रीदेवी खरंतर स्वतःच्या आयुष्यात एकटीच होती. तिचं बोनी कपूर यांच्याशिवाय कोणीच नव्हतं, असंही राम गोपाल वर्मानं पत्रात म्हटलं आहे.