ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 18 - मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गजबजलेले स्थानक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुखेनैव सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्याचा भांडाफोड गुरुवारी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला.
डोंबिवली स्थानकाचे स्टेशनमास्तर, तसेच जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांना संबंधित मटका केंद्र आणि व्हिडीओ पार्लर ताबडतोब सील करण्यास सांगून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश खासदार शिंदे यांनी लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरेमठ यांना दिले.
डोंबिवली स्थानकातील गैरसोयींबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यामुळे खासदार शिंदे यांनी गुरुवारी (18 मे) स्थानकाला भेट दिली. याप्रसंगी फलाट क्रमांक १ येथे कल्याण दिशेला रेल्वेच्या हद्दीत बेकायदा मटका केंद्र आणि व्हिडीओ पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
खासदारांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही अड्डे शिवसैनिकांनी बंद पाडले. खासदार शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांना पाचारण करून हे दोन्ही अड्डे त्वरित सील करण्यास सांगितले. तसेच, आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिश्रा, जीआरपीचे सहायक पोलीस निरीक्षक डोळे आणि स्टेशन मास्तर ओ. पी. करोठिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.
स्थानकातील अन्य गैरसोयींबाबतही खासदार शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. स्थानकातील एकही शौचालय सुरू नसून प्लॅटफॉर्म क्रमांक ३/४वर कल्याण दिशेला असलेले शौचालय त्वरित सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ येथील बुकिंग ऑफिसच्या मागे सुरू असलेल्या शौचालयाचे बांधकाम रखडल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. त्यावर, जून अखेरीपर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, असे सहायक विभागीय अभियंता गुमगावकर यांनी सांगितले.
फेरीवाल्यांचा स्थानकात मुक्त वावर असून रेल्वे हद्दीचा वापर फेरीवाले आपले सामान ठेवण्यासाठी गोडाउनसारखा करतात, त्याबद्दलही खासदार शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. फेरीवाल्यांच्या सामानामुळे काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी आग लागली होती. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अनावस्था प्रसंग ओढवू शकतो, त्यामुळे फेरीवाल्यांना कुठल्याही परिस्थितीत रेल्वे परिसराचा वापर करू देऊ नका, असे त्यांनी स्टेशन मास्तर तसेच पोलीस अधिकाऱ्यांना बजावले.
प्लॅटफॉर्म क्रमांक १ए येथे लोकल आणि फलाट यात अंतर असल्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्वरित या फलाटाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्याची सूचनाही त्यांनी केली. प्लॅटफॉर्म क्र. ३/४वर कल्याणच्या दिशेने उतरणाऱ्या एफओबीच्या पायऱ्यांमधील असमान अंतरामुळे गर्दीच्या वेळी अपघात होतात. त्यामुळे या पायऱ्या बदलण्याचे कामही तातडीने हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. फलाट क्र. तसेच, महिलांच्या डब्यांच्या जागी स्थानकांमध्ये पंखे नसल्याची बाब काही प्रवाशांनी नजरेस आणून देताच त्यांनी त्वरित पंखे बसवण्यास सांगितले.
रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या पूर्व-पश्चिम नाल्याची तातडीने सफाई हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हा नाला महत्त्वाचा असून त्याची सफाई न झाल्यास थोड्याशा पावसातही पूर्वेकडील बाजूस मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे त्वरित नालेसफाई हाती घेऊन कारवाईचा अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले.
याप्रसंगी डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, महिला शहर संघटक कविता गावंड, नगरसेवक विश्वनाथ राणे, तात्या माने, उपशहर संघटक प्रकाश तेलगोटे, वैशाली दरेकर, खासदार प्रवासी रेल्वे समन्वय समितीचे निलेश भणगे, स्वाती मोहिते, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष लता अरगडे आदी उपस्थित होते.