आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. श्रीकांतला २०१४ ला कोणी ओळखत नव्हते याची आठवण सांगत या निवडणुकीला श्रीकांत शिंदे चार लाख मतांनी मागे होता, त्याला एकाच पॉकेटमध्ये दीड लाखाने लीड कमी करता आले असा किस्सा सांगितला.
आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो...; महायुतीवर एकनाथ शिंदेंची खंत, म्हणाले...
शिंदे संपणार असे काही जण म्हणत होते, मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. शिंदे संपला नाही, जिंकला तुमच्यासाठी, असेही शिंदे म्हणाले. ठाणे हा आनंद दिघे, एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. कल्याणमध्ये तर मी एकदाच गेलो. त्यांना म्हणालो तुम्ही बाकीचा मतदारसंघ फिरा, मला एकदा येऊद्या. श्रीकांतला उमेदवार म्हणून २०१४ ला कोणी ओळखत नव्हते. त्याने त्याची ओळख निर्माण केली. चार लाखांनी गेला होता. एक पेटी आली आणि त्यांचा लीड दीड लाखाने घसकन खाली झाला, असे शिंदे म्हणाले.
ज्या बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काँग्रेसने काढून घेतला होता, त्या काँग्रेसला मी मतदान करणार असे सांगणारे बाळासाहेबांचे वारसदार कसे होऊ शकतात. त्यांच्या आत्म्याला काय वेदना होत असतील. मुंबईतील चार जागांवर काय झाले, यामिनी जाधव यांच्या मतदारसंघात काय झाले, आपल्याला मतदान सिंगल डिजिटमध्ये त्यांना हजारात मतदान झाले, असे सांगताना शिंदे यांनी काही ठिकाणची आकडेवारी सांगितली. राहुल शेवाळे देखील असेच आहे, असे सांगत ठाकरे गटाला कोणाचे मतदान झाले ते समजून घ्या, असे शिंदे कार्यकर्त्यांना म्हणाले.
९९ टक्के मते तुम्हाला, मग कुठले मोबाईल लावून, ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केले होते, तुम्ही जिंकला तर ते चांगले, हरला तर वाईट. वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिव्हारी लागला आहे. यांना काय नाव दिले पाहिजे, रडे गट दिले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. सारखाच रडीचा डाव. जिंकलो, जिंकलो असा ढोल पिटताय कोणाच्या जिवावर, असा सवाल शिंदे यांनी केला. शिवसेनेचा मतदार तुमच्यासोबत राहिलाय का याचा विचार करा, मुंबईत त्यांच्यापेक्षा अडीज लाख मते आपल्याला जास्त मिळाली आहेत. उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. भगव्यावर हिरवे झेंडे फडकत होते. मतांसाठी किती लाचार व्हाल लाज नाही वाटली का असा सवाल करत याचे उट्टे तुम्ही विधानसभेला काढणार की नाही, असा सवाल शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केला.