मुंबई - राज्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी साथ दिली. शिंदेंच्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेले. त्यानंतर बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणं पसंत केले.
सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेसोबतच पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारणी बनवली. त्याचसोबत प्रवक्ते आणि इतर पदाधिकारी यांची नेमणूक सुरू ठेवली आहे. त्यात आता मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना युवासेना प्रमुख करावं अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील फेरबदलानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं. आमदार, खासदार यांनी मूळ शिवसेनेची साथ सोडल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अवस्था कमकुवत झाली. शिंदेंच्या बंडाला उत्तर म्हणून राज्यभरात आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत दौरे सुरू केले. त्यात एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार प्रामुख्याने आदित्यच्या टार्गेटवर असतात. आदित्यनंतर आता उद्धव ठाकरेही गणेशोत्सवानंतर महाप्रबोधन यात्रा काढत महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मात्र त्यापूर्वी शिवसेनेसोबत आता युवासेनेवरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्याचा प्रयत्न झाला आहे.
शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत युवासेनेचे प्रमुख म्हणून श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. जाधव यांनी शिंदे यांची नंदनवन बंगल्यात भेट घेतली. या बैठकीनंतर जाधव म्हणाले की, शिवसेनेची संघटना आम्ही बांधली. युवासेनेच्या बाबत लोकांना आवडणारा, युवकांमध्ये रमणारा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांची युवासेना प्रमुखपदी निवड करावी असं त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेनेसोबत युवासेनेवर शिंदे गटाने लक्ष केले आहे. सध्या खरी शिवसेना कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला त्यांचे म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे. परंतु दुसरीकडे कोर्टाने निवडणूक आयोगाला निकाल येईपर्यंत निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे.