SSC Exam: “१० वीच्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास तुम्हाला ठार मारू”; याचिकाकर्त्यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:26 AM2021-05-30T10:26:55+5:302021-05-30T10:30:46+5:30
लॉकडाऊनमुळे १० वी बोर्डाच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत मात्र याविरोधात पुण्यातील एका सेवानिवृत्त प्राध्यपकाने हायकोर्टाने धाव घेतली आहे.
पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. १० वी च्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणं योग्य राहणार नाही असा आक्षेप घेत धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावरून आता त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस स्टेशला याबाबत तक्रार नोंदवली आहे त्यात म्हटलंय की, लॉकडाऊनमुळे १० वी बोर्डाच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून या परीक्षा पुन्हा घ्याव्यात या मागणीसाठी मी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचाच राग मनात धरत फेसबुकच्या माध्यमातून दोन जणांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल असं या दोघांनी धमकावल्याचं म्हटलं आहे.
याबाबत पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. प्रथमेश पाटील आणि भगवान ढाकणे असं या दोघांचे नाव आहे. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून या दोघांचा शोध सुरू आहे.
याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिलाय प्रस्ताव
दहावीच्या परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर आणि २ सत्रांत केल्यास हे शक्य होऊ शकते, असे नियोजन याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी मांडले आहे. कुलकर्णी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, शाळेतील दहावीची एकूण विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन त्यांची सकाळ आणि दुपार अशा दोन गटांत विभागणी करून परीक्षा घेतल्यास, गर्दी न होता १५ दिवसांत परीक्षा पार पाडली जाऊ शकते. तसेच परीक्षा केंद्रांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास शाळांकडून आवश्यक ती खबरदारी जबाबदारी म्हणून नक्कीच पार पाडली जाईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.परीक्षेसाठी खासगी वाहने तसेच आवश्यक अशी विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाऊ शकते, असे मतही त्यांनी मांडले
प्रस्ताव असा...
- परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर
- विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
- शाळेत परीक्षार्थी, संबंधित शिक्षकांना प्रवेश
- उत्तरपत्रिकांचे शाळेतच मूल्यांकन
-संगणकीय व्यवस्थेद्वारे सगळे गुण शिक्षण मंडळाकडे पोहोचवणे
नेमका फॉर्म्यूला काय?
राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार नसली तरी त्यांच्या आजवरच्या शालेय कामगिरीच्या आधारावर १०० गुणांची विविध भागांत विभागणी करण्यात आली आहे. यात दहावीच्या अभ्यासक्रमावर लेखी परीक्षेसाठी ३० गुण, इयत्ता १० वीचे विद्यार्थ्यानं आजवर केलेले गृहपाठ आणि तोंडी परीक्षेसाठी २० गुण आणि इयत्ता नववीच्या निकालाला ५० गुण अशाप्रकारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे. यंदा इयत्ता १० वीच्या परीक्षेला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा इयत्ता ९ वीचा निकाल लागला त्यावेळी कोरोनाचं संकट नव्हतं. त्यामुळे तो निकाल सामान्य परिस्थितीतील निकाल होता. त्याच पार्श्वभूमीवर इयत्ता ९ वीच्या निकालाला ५० गुण देण्यात आले आहेत, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.