सचिन देशमुख, नाशिक : इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (दि. २१) पासून, तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांबाबत कठोर नियमावली जारी केली असल्याने त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच परीक्षेच्या वेळापत्रकात दोन दिवस दहावी - बारावीचे पेपर एकाच वेळी ठेवल्याने शाळा स्तरावर संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी याबाबत घोळ झाल्याचे मान्य करत त्यावर उपाययोजना सुरू असल्याचे सांगत प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी कोणतीही अडचण उद्भवणार नसल्याची ग्वाही दिली आहे.
दहावी - बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, मंगळवार, दि. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवातही होत आहे. त्यानुसार शाळा व केंद्रस्तरावर त्याचे नियोजन व अंमलबजावणी सुरू असतानाच काही शाळांमध्ये बैठक व्यवस्थेबाबतचा घोळ समोर आला आहे. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांसह केंद्रप्रमुख गोंधळून गेले आहेत.
दहावी व बारावीचे दोन पेपर एकाच वेळी आणि एकाच दिवशी आल्याने मोठी गडबड झाली आहे. दि. ६ मार्च रोजी दहावीचा इंग्रजी, तर बारावीचा सहकार विषयाचा पेपर सकाळी ११ ते २ या एकाच वेळी ठेवण्यात आला आहे, तर दि. १७ मार्च रोजी दहावी विज्ञान १चा, तर बारावीचा भूगोल विषयाचा पेपर एकाच दिवशी सकाळी ११ ते २ या वेळेत ठेवण्यात आला आहे.