सोलापूर : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाचे आंदोलक पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ७ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. त्याशिवाय विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने हा पायी दिंडी मोर्चा निघणार आहे. मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटी बस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कारवाईचे आदेशविठ्ठल मंदिर परिसरात ६ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजेपासून ते ७ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास अथवा जमण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.