पुणे : कोणत्याही कारणांमुळे एसटी महामंडळाची बस बंद पडली किंवा अन्य समस्या निर्माण झाल्यास प्रवाशांना आता कोणत्याही उच्च श्रेणीच्या बसमधूनही प्रवास करता येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारले जाणार नाही. पुर्वी साधी बस बंद पडली असल्यास त्याच प्रकारच्या बसमधून जाण्याची मुभा प्रवाशांना दिली जात होती. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे. अनेकदा मार्गावर बसमधील तांत्रिक बिघाड, अपघात किंवा इतर कारणांमुळे बस बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. आतापर्यंत ज्या श्रेणीतील बस बंद पडली आहे, त्या श्रेणीतील बसमधूनच संबंधित प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. तर इतर बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात होते. पण अनेक मार्गांवर बसची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांना तासनतास बस उपलब्ध होत नव्हती. उच्च श्रेणीतील बसमधून प्रवास करणे अनेक प्रवाशांना परवडणारेही नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होत होती. यापार्श्वभुमीवर एसटीने प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व बसमधून प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही प्रकारच्या बसचा मार्गात खोळंबा झाल्यास बसमधील प्रवाशांना अन्य कोणत्याही श्रेणीतील बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यासाठी जादा पैसे द्यावे लागणार नाहीत. पासधारकांनाही या सुविधे फायदा मिळणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबतचे परिपत्रक लवकरच सर्व आगारांना पाठविले जाणार आहे. परिपत्रकानुसार आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कर्मचाºयांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एसटी बंद पडल्यास कोणत्याही बसमधून करा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 9:09 PM
अनेकदा मार्गावर बसमधील तांत्रिक बिघाड, अपघात किंवा इतर कारणांमुळे बस बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो.
ठळक मुद्देआतापर्यंत ज्या श्रेणीतील बस बंद त्या श्रेणीतील बसमधूनच संबंधित प्रवाशांना होता प्रवास एसटीने प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी सर्व बसमधून प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय