मुंबई : कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर यादरम्यान २५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून, मुंबई विभागातून २६ जूनपासून ११२२ गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक पसंती ग्रुप बुकिंगला देण्यात आली आहे.
गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. मुंबई विभागातून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
बसचे आरक्षण
- गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील.
- ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील.
- बस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून आरक्षण बसस्थानक किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर, मोबाइल ॲपद्वारे, खासगी बुकिंग एजंट व त्यांच्या ॲपवर उपलब्ध आहे.
दुरुस्ती पथकही तैनात गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.
आगार ग्रुप बुकिंग आरक्षण एकूणमुंबई सेंट्रल २८३ १०२ ३८५परळ २३६ १७५ ४११कुर्ला २२३ ७८ ३०१पनवेल ५ १२ १७उरण ० ७ ७एकूण ७४७ ३७४ ११२२