मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनाही तिकिटे काढण्यासाठी भाग पाडले जात असून, त्या जाचातून त्यांची मुक्तता करावी आणि कामगार करारातील १२ कलमे वगळू नयेत, या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते जाणूनबुजून मान्यताप्राप्त संघटनेला ‘टार्गेट’ करत असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी केला आहे.एसटीच्या दोन अधिकाऱ्यांनी एसी बसमधून विनातिकीट प्रवास केला आणि ही बाब उघडकीस येताच, त्यांच्याविरोधात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कठोर कारवाई केली. यानंतर कर्मचाऱ्यांना तिकीट काढून प्रवास करण्याच्या सूचना परिवहनमंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत. यात एसटीचा चालक व वाहक भरडला जात असल्याचे युनियनकडून सांगण्यात आले आहे. त्यांना कर्तव्याचा पास एसटीकडून मिळत असतानाही नाइलाजास्तव तिकीट काढावे लागत आहे. मुळात एसटीच्या प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मोठ्या प्रमाणात मिळतो, परंतु अन्य कर्मचाऱ्यांची स्थिती तशी नाही, असे चव्हाण म्हणाले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्यात एसटी संघटनांमध्ये असलेले वर्चस्व कमी करण्यासाठीच हे सर्व प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे कामगार वर्गात संतापाची लाट पसरल्याचे ते म्हणाले.
एसटी बंदचा इशारा
By admin | Published: April 11, 2016 2:58 AM