मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बहुचर्चित टोल फ्री कॉल सेंटर सेवा गुरुवारी सुरू झाली. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते कॉल सेंटरचे उद्घाटन झाले. प्रवाशांसह एसटीच्या कर्मचा-यांनीही कॉल सेंटरवर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन या वेळी रावते यांनी केले. मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात हा उद्घाटन सोहळा पार पडला.एसटी सेवांचे नियमन आणि वेळापत्रक चौकशीसाठी प्रवाशांना कॉल सेंटरची मदत घेता येईल. प्रवाशांच्या तक्रारींचे निवारणही करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून या वेळी देण्यात आली. तर प्रवाशांनी तक्रार केल्यास त्याबाबतचा संदेश आणि टोकन क्रमांक तक्रारदाराच्या मोबाइलमध्ये येणार आहे. या टोकन क्रमांकानुसार संबंधित तक्रारीबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल. लवकरच व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमचाही कॉलसेंटरमध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती एसटी उपाध्यक्ष- व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी यावेळी बोलताना दिली.दिनकर रायकर म्हणाले की, एसटी प्रवाशांना आवश्यक ती माहिती कॉल सेंटरच्या माध्यमातून मिळेल. त्यांच्या तक्रारीबाबत टोकन क्रमांकाचा संदेश मोबाइलमध्ये येईल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग बरगे यांनी केले.१८०० २२ १२५० या टोल फ्री क्रमांकावर प्रवासी तसेच एसटीचे कर्मचारी तक्रार नोंदवू शकतात.
एसटी महामंडळाचे कॉल सेंटर सुरू; प्रवाशांसह, कर्मचा-यांनीही तक्रारी नोंदवाव्यात - दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 3:29 AM