लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाला कोरोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाने सल्ल्यासाठी केपीएमजी संस्थेची नेमणूक केली होती. ही कंपनी एसटी महामंडळाचा अभ्यास अहवाल पुढील महिन्यात सादर करणार आहे.
एसटी महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्या एसटी महामंडळाला २९० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. तर वेतनासाठी ३९० कोटी, डिझेलसाठी २९२ कोटीपर्यंत खर्च येतो. याशिवाय टायर आणि इतर खर्च आहे. सध्या एसटी महामंडळाने महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवला आहे. त्यामुळे वेतन खर्च ३०० कोटी रुपयांहून अधिक होणार आहे.
केपीएमजी कंपनीला गेल्या महिन्यात ऑपरेशनल खर्च कमी करणे, आवश्यकता नसलेल्या बाबीवर खर्च कमी करणे, एसटीसाठी नवीन आर्थिक उत्पन्नाचे स्रोत शोधणे, एसटीची व्यावसायिक आणि संस्थात्मक पुनर्रचना, काम सुधारण्यासाठी उपाययोजना, सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या शक्यतेचा विचार या विषयांवर इतर राज्यातील अभ्यास करण्यासाठी काम दिले होते.
एसटी संपातील ५६९ कर्मचाऱ्यांना नोटीस
विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांवरचा कारवाईचा बडगा सुरूच आहे. एसटी महामंडळाने शनिवारी निलंबित कर्मचाऱ्यांपैकी २१४ जणांना कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे एकूण आकडा ५६९ झाला आहे. महामंडळाने शनिवारी ३२ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. आतापर्यंत राेजंदारीवरील २०५६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १०७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे