मुंबई : आर्थिक संकट असल्याची नेहमीच ओरड करणाऱ्या एसटी महामंडळाला साजरा करण्यात आलेला ‘लोकार्पण’ सोहळा चांगलाच महागात पडला. अनेक योजनांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाकडून नुकताच साजरा करताना त्यावर तब्बल २ कोटींची उधळपट्टी करण्यात आली. या उधळपट्टीमुळे एसटी अधिकाऱ्यांमध्येच नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात पार पडला. या सोहळ्यासाठी एसटीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. सरकारी सोहळ्याला ‘इव्हेन्ट’चे स्वरूप आले. एका इव्हेन्ट कंपनीकडून या सोहळ्याची तयारी करण्यात आल्याने त्यांचे सदस्य आवर्जून सहभागी झाले होते. कार्यक्रमाची भव्यता ठेवतानाच अनेक मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यासाठी कार्यक्रमाच्या मोठ्या प्रमाणात निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या. जवळपास १५0पेक्षा जास्त निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. तसेच या सोहळ्याची जाहिरातही करण्यात आली. जाहिरातबाजी, निमंत्रण पत्रिका आणि आगारात सोहळा पार पाडण्यासाठी लागणारा स्टेज, स्क्रीन, साऊंड सिस्टिमसह, खाण्यापिण्याचा खर्च इत्यादींसाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले. परिवहन विभाग आणि एसटी यांचा हा संयुक्त सोहळा असला तरी हे पैसे एसटीलाच द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एसटी महामंडळाचे महागडे ‘लोकार्पण’
By admin | Published: January 26, 2016 3:05 AM