लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी महामंडळातर्फे २ जुलै रोजी चालक, वाहक पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेस पात्र उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र, बैठक क्रमांक व परीक्षा केंद्राबाबतचा तपशील ई-मेलद्वारे अथवा एसएमएसद्वारे लवकरच कळविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल व लेखी परीक्षेसंदर्भात अफवा पसरविणाऱ्या व निवड करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांबाबत संबंधित उमेदवार अथवा त्यांच्या नातेवाइकांनी सावध राहावे. त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.जानेवारीमध्ये चालक, वाहक पदासह लिपिक टंकलेखक व इतर पर्यवेक्षक पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. यासाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. त्यापैकी एसटीच्या कोकण विभागाकरिता घेण्यात येणाऱ्या चालक, वाहकांच्या ७ हजार ९२९ पदांसाठी २८ हजार ३१४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी ४४५ अर्ज हे महिलांचे आहेत; यांची लेखी परीक्षा २ जुलै रोजी होणार आहे. उर्वरित पदांसाठी लवकरच परीक्षेची तारीख निश्चित करण्यात येईल.
एसटी चालक, वाहक पदाची परीक्षा २ जुलैला
By admin | Published: June 15, 2017 2:09 AM