रायगड: मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावलीये. पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळत आहे. या पूरामुळे अनेक ठिकाणी रस्ते-पूल पाण्याखाली गेले आहे. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. नदीला पूर आलेला असतानाही पुराच्या पाण्यातून 52 प्रवासी बसलेली एसटी बस चालकाने नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने केलेल्या या 'पराक्रमा'मुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
चालकाचे निलंबन
मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी बंधारा उलटून पाणी ओसंडून वाहत होते. या पाण्यात खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला. तरीदेखील एसटीमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या पाण्यातून एसटी नेण्याचा मुर्खपणा केला. त्याच्या या पराक्रमामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. परंतु, केवळ सुदैवाने ही एसटी बस रस्त्याच्या पलीकडे गेल्याचे दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्या चालकाचे निलंबन केले आहे. याबाबत ट्विट करुन महामंडळाने ही माहिती दिली.
कोकणात पावसाची जोरदार हजेरीमागील दोन दिवसांपासून पावसाने रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात सरासरी 139.57 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, रविवारी जिल्ह्यातील मुरूड , श्रीवर्धन, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर भागात पावसाने धुवादार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.