लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात अखेरीस गुरुवारी वेतन जमा झाले. सरकारकडून ३५० कोटींची मदत मिळाल्यावर दुपारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले. वस्तुत: डिसेंबरच्या वेतनासाठी महामंडळाने ३९० कोटी रुपयांची मागणी केली होती.
दर महिन्याला सात तारखेला वेतन होत असते. ते ७ ते १० या तारीखेपर्यंत देण्याची हमी राज्य शासनाने संपाच्या दरम्यान न्यायालयात दिली होती. पण निधीअभावी वेतन १० तारीखेपर्यंत मिळत नाही. वेतनासाठी एसटी महामंडळाने ३९० कोटींची मागणी केली असताना केवळ ३५० कोटी देण्यात आले. सरकार एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. वेतनासाठी राज्य सरकारने सवलतमूल्य वेळेवर द्यायला हवे. त्यासाठी एसटी महामंडळाने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. काही कारणास्तव वेतन उशिरा मिळाले परंतु यापुढे वेतन १० तारखेपूर्वी मिळेल यासाठी प्रयत्न करू. -डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ