प्रदीप शिंदे -- कोल्हापूर -खादी उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून एस. टी. महामंडळाचे कर्मचारीही आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे वापरणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे सुमारे एक लाख कर्मचारी खादीचे कपडे वापरून आता खादीचा प्रचार करताना दिसणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी. सध्याच्या काळात लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी सरकारी कार्यालयांत आठवड्यातील एक दिवस कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालून कार्यालयांमध्ये यावे, असे आवाहन गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून करण्यात आले होते. यानुसार खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातील आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांंना आठवड्यातून एकदा तरी खादीचा गणवेश वापरण्याचे आवाहन करणारे परिपत्रक महामंडळाने गेल्याच आठवड्यात काढले आहे. महामंडळाने खादीचे गणवेश वापरण्यासाठी कोणतीही सक्ती केलेली नसून ही पूर्णत: ऐच्छिक बाब आहे. इतर कर्मचाऱ्यांबरोबरच खाकी गणवेश असलेल्या एस.टी.च्या चालक-वाहकांनीदेखील खादीचा किमान एक संच शिवून घ्यावा व आठवड्यातून आपल्या ऐच्छिकतेने परिधान करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नाळ ही सर्वसामान्य जनतेपर्यंत थेट पोहोचली असल्याने खादीचा प्रचार व प्रसार या माध्यमातून होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. खादीचे कापड शरीरासाठी उत्तम असते. खादीमुळे उन्हाळ्यात थंडावा, तर हिवाळ्यात उबदारपणा मिळतो. यात रासायनिक द्रव्यांचा कमीत कमी वापर असल्याने ते अपायकारक नसते. या सर्व बाबींमुळे हल्ली खादी घालण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. महामंडळाने जरी एक दिवस खादी घालण्याचे आवाहन केले असले तरी ते ऐच्छिक आहे. या चांगल्या उपक्रमास सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे.- नवनीत भानप,विभाग नियंत्रक, कोल्हापूर ग्रामोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या आणि गावागावांतील कलावंतांच्या हातांना काम देणाऱ्या खादीच्या वापरास चालना मिळणारा हा उपक्रम आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून महत्त्वाच्या ठरलेल्या खादी उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या संघटनेचा पाठिंबाच राहील. - संजीव चिकुर्डेकर, सचिव, एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटना४परिपत्रकाद्वारे महामंडळाचे आवाहन ४आठवड्यातून एक दिवस वापरा खादी ४सक्ती नसून ही पूर्णत: ऐच्छिक बाब
एस.टी.चे कर्मचारी करणार ‘खादी’चा प्रचार
By admin | Published: March 30, 2017 1:29 AM