एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२००० कोटी रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. असे असतांना देखील, सर्व कर्मचा-यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
कर्मचारी बांधवांनो.... आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (२८ टक्के ) व घरभाडे भत्ता (८, १६, २४ टक्के ) मान्य केले आहे. तसेच दिवाळी भेट ही दिली आहे. असे असुन देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे, त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य शासन मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे प्रामाणिकपणे अनुपालन करत आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने आपले कार्य सुरु केले आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
बंधु भगिनींनो.... आपण संप मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुध्दा विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. अर्थात, संपाचा विपरीत आर्थिक परिणाम संस्था आणि संस्थेचे कर्मचारी म्हणुन आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळे गेली कित्येक दिवस सर्व सामान्य प्रवाशी जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या सर्वांचा विचार करुन आपण तातडीने संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजु व्हावे हीच आपणांस विनंती, असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.