मुंबई - एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. परिणामी, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर म्हणजे ३ सप्टेंबरपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा फटका गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, ऐन सणासुदीच्या तोंडावर नागरिकांना असे वेठीस धरणे योग्य आहे का? असा सवाल आता प्रवासी विचारत आहेत.
यापूर्वी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचारी संघटनेने ९ आणि १० जुलै रोजी धरणे आंदोलन केले होते. आता कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने ३ सप्टेंबरपासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विविध मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर मागण्यांबाबत तोडगा निघाला तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.
मागण्या काय? राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन. २०१८ ते २०२४ पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ. ५८ महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी. ५७ महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी.
मुख्यमंत्री यांच्या स्तरावर अद्याप बैठक झाली नसल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यावर तोडगा निघत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही. -संदीप शिंदे, सरचिटणीस, कृती समिती