मुंबई - वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात आता एसटी भाडेवाढीची भर पडली आहे. वाढते इंधन दर आणि प्रशासकीय खर्चामुळे एसटी महामंडळाने आजपासून तिकीट दरांत १८ टक्के भाडेवाढ लागू केली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटात तब्बल २४ ते १२९ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबई-पुणे शिवनेरीचा प्रवास ८३ रुपयांनी महागला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी प्रवासासाठी आता ४४७ रुपयांऐवजी ५३० रुपये मोजावे लागणार आहेत.सुट्ट्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी भाडे आकारणी पाचच्या पटीत होईल. यानुसार दोन प्रवासी टप्प्यांवरील तिकीट दर ८ रुपये असल्यास १० रुपये आकारण्यात येणार आहेत. तिकीट दरवाढीचा फटका राज्यातील सुमारे ७० लाख प्रवाशांना बसणार आहे. शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या पासवरदेखील भाडेवाढीचा परिणाम होईल. वाढत्या इंधन दरामुळे नाइलाजाने तिकीट दरवाढ करण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.भाडे वाढल्यामुळे शिवशाहीने खासगी बसच्या दरांची बरोबरी केल्याचे चित्र आहे. मुंबई-पुणे शिवशाही तिकिटासाठी २९० रुपये तर खासगी बस ३०० रुपये आकारते. मुंबई-रत्नागिरी मार्गावर शिवशाहीसाठी ५४० रुपये तर खासगी बससाठी ४५० ते ६०० रुपये मोजावे लागतात.
एसटीची भाडेवाढ लागू, आजपासून प्रवास महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:47 AM