मुंबई : आर्थिक संकटातील एसटीला बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे परदेश आणि देशांतर्गत दौऱ्यावर दौरे होत असतानाच पुन्हा एकदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ब्राझील दौरा आखण्यात आला होता. २ नोव्हेंबरपासून होणाऱ्या या दौऱ्याला शासनाने स्पष्ट नकार दिल्यामुळे हा दौराच एसटी महामंडळाला रद्द करावा लागला आहे. अशा दौऱ्यातून एसटीकडून काहीही साध्य होत नसल्यामुळेच दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या दौऱ्यावर जाणाऱ्या अधिकाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. केंद्राच्या एसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) भारतातील प्रत्येक राज्यातील एसटी महामंडळासाठी परदेशात अभ्यास दौरा आखला जातो. दरवर्षी होणाऱ्या या दौऱ्यात महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचाही सहभाग असतो. यंदा ब्राझीलचा होणारा हा दौरा २ नोव्हेंबरपासून सुरू होणार होता. या दौऱ्यात वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी एकनाथ मोरे, वाहतूक - महाव्यवस्थापक विनोद रत्नपारखी, वरिष्ठ प्रोग्रामर - ईडीपी वीरेंद्र कदम, उपमहाव्यवस्थापक - प्रशिक्षण- (भोसरी) मिशा बंड, मुख्य अभियंता चालक आर. एम. पवनीकर यांचा समावेश होता. मात्र गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून होणाऱ्या अभ्यास दौऱ्यातून एसटी महामंडळात काही एक बदल होताना दिसले नाहीत. तरीही परदेश दौरे वारंवार होताना दिसतात. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी परिवहन विभाग, अर्थ विभाग आणि मुख्य सचिवांची परवानगी लागते. मात्र शासन स्तरावर या दौऱ्याला स्पष्टपणे नकार देण्यात आला. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना विचारले असता, हा दौरा शासनाकडूनच रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी अधिकाऱ्यांचा ब्राझील दौरा रद्द
By admin | Published: November 06, 2014 3:29 AM